महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। सध्या नागपुरातही हिट अँड रनची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात भरधाव वेगात आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात काही जण जखमी झाले. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ऑडी कारमुळे हा अपघात झाला त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावे आहे. हा अपघात झाला त्यावेळी गाडीत अर्जुन हावरे, रोनित चित्तमवार, संकेत बावनकुळे हे तिघेजण होते. ही गाडी संकेतचा मित्र अर्जुन चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एक मोठा खुलासा केला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संकेत बावनकुळेच्या ऑडी कारच्या अपघाताबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. संकेत बावनकुळे याच्या गाडीमध्ये एका लाहोरी बारचे बिल मिळाले आहे. या बिलवर दारू, चिकन, मटणसह बीफ (गोमांस) कटलेटचाही उल्लेख आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. श्रावण, गणपती आहे असे म्हणत हिंदूत्व शिकवणाऱ्या लोकांनीच बीफ कटलेट खाल्ले असून हीच लोक या मुद्द्यावरून मॉब लिंचिंगही करतात, असा टोला संजय राऊतांनी केली.
तुम्ही काय आम्हाला हिंदूत्व शिकवणार
“पोलिसांना संकेत बावनकुळे याच्या गाडीमध्ये एका लाहोरी बारचे बिल मिळाले आहे. हे बिल संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र ज्या बारमधून बाहेर पडले, तिथल्या खाण्या-पिण्याचे आहे. या बिलवर दारू, चिकन, मटणसह बीफ (गोमांस) कटलेटचाही उल्लेख आहे. श्रावण, गणपती आहे असे म्हणत हिंदूत्व शिकवणाऱ्या लोकांनीच बीफ कटलेट खाल्ले असून हीच लोक या मुद्द्यावरून मॉब लिंचिंगही करतात. पोलिसांनी हे बिल जप्त केलेले असून तुम्ही बीफ खायचे अन् रस्त्यावर, रेल्वेमध्ये मॉब लिंचिंग करायचे. वा रे हिंदूत्व. तुम्ही काय आम्हाला हिंदूत्व शिकवणार”, असा घणाघात संजय राऊतांनी लगावला.
पोलिसांनी हे बिल जप्त केलं
“त्या गाडीत लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे. त्या बिलात खाण्या-पिण्याच्या बद्दल नमूद करण्यात आले आहे. ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे. त्यात दारुचं बिल आहे. त्यात चिकन, मटण आणि बीफ कटलेटचंही बिल आहे. हे आम्हाला हिंदूत्व शिकवत आहेत. त्याने बीफ कटलेटही खाल्लं आहे. त्याचेही पैसे दिले आहेत. पोलिसांनी हे बिल जप्त केलं आहे. तुम्ही बीफ खायचं आणि रस्त्यावर लोकांचे बळी घ्यायचे हे नक्की काय चालू आहे”, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.