महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – मुंबई – , 22 जुलै : : भारतात कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात सण समारंभ, उत्सव, मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. गणेशोत्सवावर अनेक घटक अवलंबून असतात. यामध्ये श्री गणेशाची मूर्ती तयार करण्यापासून ते विसर्जनापर्यंत अनेक घटकांमार्फत वेगवेगळ्या सेवा आणि वस्तु पुरविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हा सण मंगलमय व्हावा यासाठी वाद्यवृंद, ढोल पथक, लेझीम पथक यांचा मोलाचा वाटा असतो.
बाप्पांच्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळी वाजत गाजत श्रींची मिरवणूकही काढली जाते. मात्र यंदा संपूर्ण देशात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्यसरकारने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन जनतेला केले आहे. याला प्रतिसाद देत राज्यातल्या बहुतांश मंडळांनी मोठ्या गणेश मूर्ती रद्द करून शासनाच्या नियमाप्रमाणे चार फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या उत्सवामध्ये लोकांची गर्दी होऊ नये आणि पुन्हा कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ढोल ताशा पथक, लेझीम पथक यासह अन्य करमणुकीच्या पथकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवामध्ये ढोलताशा, लेझीम पथकांचा रापता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रात साध्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. यामुळे यंदा गणेशोत्सवामध्ये दणाणून सोडणार्या ढोल ताशांचा आवाज आपणास ऐकायला मिळणार नाही. सहाजिकच ढोल पथक, लेझीम पथकासह अन्य वाद्य वृंदांवर उपजीविका करणाऱ्या कलाकारांना याचा मोठा फटका बसणार आहे.
राज्यातील या ढोलताशा पथकांसह राज्यातल्या कानाकोपऱ्यांत हजारो लेझीम, पारंपरिक वाद्यांची पथके कार्यरत आहेत. या साऱ्यांची उपजीविका या पथकांवर आहे. गणेशोत्सवामध्ये या पथकांना चांगली बिदागी मिळत असते. काही ढोल ताशे पथकं तर वर्षभर केवळ याच व्यवसायावर अवलंबून असतात. कोरोनामुळे या सर्व घटकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर वर्षातील सर्वात मोठा असणारा उत्सवच साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे त्यांचा हा सिझन सुद्धा हातातून निघून जाणार आहे.