महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गणरायाच्या आगमनापासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत असून विदर्भात झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवसही राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
मध्य भारतात असलेले कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. आज (गुरुवार, ता. १२) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर राज्यातील उर्वरित भागांमध्ये उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाने उघडीप दिल्यास पुन्हा उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.
आज, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात पाऊस विश्रांती घेईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळ्यामध्येही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.