महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। पुण्यामध्ये वाहतुकीमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. घोरपडी रेल्वे उड्डाणपुलावरून नेहमी प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. या रेल्वे उड्डाणपुलाच्या वाहतुकीमध्ये पुणे वाहतूक पोलिसांनी बदल केले आहेत. वाहतूक पोलिसांनी यासाठी पर्यायी मार्गाची देखील माहिती दिली आहे. त्यासोबत या पुलावरून मालवाहू जड वाहने आणि पीएमपी बसला देखील मनाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडीतील पुणे-मिरज रेल्वेलाइनवरील उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. घोरपडीतील युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) परिसरातून मुंढव्याकडे जाणारी वाहने केंद्रीय विद्यालय चौक ते घोरपडी पोलिस चौकीमार्गे जातील. मुंढवा, घोरपडी रेल्वे पुलावरून युद्धस्मारकाकडे फक्त दुचाकी, रिक्षा आणि मोटारींना प्रवेश देण्यात येणार आहे.
घोरपडी रेल्वे उड्डाणपुलावरून मालवाहू जड वाहने आणि पीएमपी बसला मनाई करण्यात आली आहे. घोरपडी युद्धस्मारकाकडे येणाऱ्या जड वाहनांनी रेल्वे उड्डाणपूल, बी. टी. कवडे रस्ता ते सोपानबाग चौकातून सोलापूर रस्त्याने इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
तसंच पुण्यामध्ये विरुद्ध दिशेने आणि ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. वाहतूक पोलिसांकडून १४ हजार ७७६ बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी वाहतूक शाखेकडून शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत एक ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान रस्त्यांवर विरुद्ध दिशेने आणि ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांवर कारनवाई करण्यात आली.
आतापर्यंत १४ हजार ७७६ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ९४ लाख ६९ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. शहरात बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात शहरात वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा चालकांविरुद्ध वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.