वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघे अटकेत, आरोपींकडून आठ पिस्तुलांसह १३ काडतुसे जप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून आठ पिस्तूल, १३ काडतुसे, सात दुचाकी, मोटार जप्त करण्यात आली आहे.

आंदेकर खून प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश, दीर गणेश यांंना अटक करण्यात आली. याप्रकरणात कोयते, तसेच पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारेला नुकतीच अटक करण्यात आली होती. पसार झालेले आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणी विरोधी पथकाने रात्री उशीरा अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, प्रताप मानकर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, राहुल मखरे आणि पथकाने ही कारवाई केली.

आंदेकर खून प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शिवम आंदेकर याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. १ सप्टेंबर रोजी वनराज यांच्यावर नाना पेठेत पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यावेळी शिवम त्यांच्यासोबत होता. हल्लेखोरांनी त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून तो पळाल्याने त्याचा जीव वाचला. त्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *