“अजित पवार म्हणालेले, तिकिटाची भीक मागायला आला का?”; भाग्यश्री आत्रामांचा गौप्यस्फोट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। ‘मी घर फोडले नाही. घर फोडून जात नाहीये. माझ्यावर शरद पवारांचे उपकार आहेत. शरद पवारांना सोडताना तुम्हाला नाही वाटले का की, घर फुटत आहे’, असा उलट सवाल करत भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवारांवर पलटवार केला. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी आज (१२ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भाग्यश्री आत्राम यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी घर फोडल्याच्या टीकेवर भूमिका मांडली.

अजित पवारांनी चूक केली -भाग्यश्री आत्राम
“भाग्यश्री आत्राम प्रवेशानंतर बोलताना म्हणाल्या, “माझ्या वडिलांनी कितीही टीका-टिप्पणी केली, तरी आशीर्वाद म्हणून घेणार. मला राग याचा आला की, अजित पवार म्हणाले, वस्तादाने एक डाव राखून ठेवलेला असतो. मी जी चूक केली, ती तुम्ही करू नका. दादांनी (अजित पवार) त्या व्यासपीठावर कबुली दिली”, असे आत्राम म्हणाल्या.

भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना दिली ऑफर
यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवारांना शरद पवारांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली. त्या म्हणाल्या, “मला दादा (अजित पवार) ज्ञान शिकवताहेत, तर मी दादांना विचारणार, तुम्हीच आमच्याकडे येऊन जा. काय वाईट आहे? तुम्ही इतक्या वयस्कर शरद पवारांना सोडले. पवार साहेबांना सोडताना नाही वाटले का की, आमचे घर फुटत आहे. तुम्ही माझ्यावर टीका करताय की, असे काही करू नका.”

“आधी तुम्ही स्वतः मान्य करायला पाहिजे की, आम्ही घर फोडले आहे. मी काही घर फोडले नाही. घर फोडून जात नाहीये. माझ्यावर पवार साहेबांचे उपकार आहेत. कारण ज्यावेळी बाबांना (धर्मरावबाबा आत्राम) नक्षलवादी अपहरण करून घेऊन गेले होते, तेव्हा शरद पवारांनी मध्यस्थी करून तिथून आणले. त्यामुळे मला आज शरद पवारांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे”, असे भाग्यश्री आत्राम यावेळी म्हणाल्या.

“…म्हणून अजित पवारांचे शब्द ऐकावे लागले”
“अजित पवार शरद पवारांना सोडून गेलेले आहेत. २०१९ मध्ये जेव्हा आम्ही तिकीट मागायला गेलो होतो, तेव्हा अजित पवार म्हणालेले की, तिकिटाची भीक मागायला आलात का? अशी भाषा त्यांनी बोलली होती. का तर बाबा भाजपच्या वाटेवर होते. म्हणून आम्हाला त्यांचे असे शब्द ऐकावे लागले”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“त्यावेळी एबी फॉर्म मिळाला. ए फॉर्ममध्ये बाबाचे नाव आणि बी फॉर्मवर माझे नाव होते. स्वतः अजित पवार म्हणालेले की, बाबा भाजपकडून लढत असतील, तर तुम्ही घर फोडून आपल्या पार्टीतून लढा. मग तेव्हा फूट पडली नाही का? याचे साक्षीदार स्वतः जयंत पाटील आहेत”, असेही भाग्यश्री आत्राम म्हणाल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *