किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये वाढून ३.६५ टक्क्यांवर; मात्र पाच वर्षातील दुसरा नीचांकी स्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। किरकोळ किमतींवर आधारित महागाईमध्ये ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ होऊन ती ३.६५ टक्क्यांवर नोंदवली गेली. महागाईच्या दरात वाढ झाली असली तरी, सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या ४ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा महागाई दर कमी राहिला आहे. मागील पाच वर्षांमध्ये असे पहिल्यांदाच घडल्याचे दिसले आहे.

किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जाहीर केली. त्यानुसार, जुलैमध्ये नोंदवल्या गेलेल्या ३.६ टक्क्यांच्या तुलनेत, सरलेल्या ऑगस्टमध्ये महागाईचा दर किंचित वर चढून ३.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२३ मध्ये हा दर ६.८३ टक्क्यांवर होता. खाद्यान्न महागाईतील वाढ ऑगस्ट महिन्यात ५.६६ टक्के राहिली आहे. त्याआधीच्या महिन्यात हा दर ५.४२ टक्के होता. गेल्या महिन्यात फळांच्या महागाईत ६.४५ टक्के, भाज्या १०.७१ टक्के आणि बिगरमद्य पेये २.४ टक्के वाढ नोंदविण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट आखून दिले आहे. त्यात अधिक अथवा उणे २ टक्के सहनशील गृहीत धरले जातात. गेल्या पाच वर्षांमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात हा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी नोंदविण्यात आला आहे. हा दर एप्रिलमध्ये ४.८ टक्के आणि मेमध्ये ५.१ टक्के होता. खाद्यान्नांच्या अकस्मात वाढलेल्या किमती या चढ्या महागाईसाठी कारणीभूत ठरल्या आहेत. महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली दीर्घकाळ राखण्याचे आव्हान रिझर्व्ह बँकेसमोर आहे.

खाद्यान्न महागाईचा ताप कायम
खाद्यान्नांच्या किमतींमध्ये घसरण होऊनही, प्रतिकूल आधारभूत परिणामामुळे ऑगस्टमध्ये खाद्यान्न महागाई वाढली आहे. पाऊस चांगला झाला असून, सुधारित खरीप पेरण्यांमुळे कृषी उत्पादनासंबंधी एकूण दृष्टिकोन सुधारला आहे. तथापि, पावसाचे असमान राहिलेल्या वितरणामुळे मुख्यत्वे सिंचनावर अवलंबून असलेल्या रब्बीच्या पेरणीबाबत चिंता कायम आहे. शिवाय, ताज्या आकडेवारीवरून डाळी आणि काही तेलबियांची पेरणी सामान्य पातळीच्या तुलनेत कमी झाली आहे. त्यामुळे खाद्यान्नाच्या किमतीबाबत येत्या काळात डोकेदुखी कायम राहणार असून त्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *