महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाण्यातील साठ्यात वाढ झाली आहे. यानुसार मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण देखील शंभर टक्के भरले आहे. यामुळे पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
मागील महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तळ गाठलेले पवना धरण (Pavana Dam) शंभरीच्या जवळपास पोहोचले होते. मात्र आता मागील काही दिवसात पुन्हा जोरदार पावसामुळे उशिरा का होईना पवना धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मावळ तालुक्यातील पवना धरणाचे पाणी पवन मावळ (Maval), तळेगाव, देहूरोड या भागासह पिंपरी चिंचवड शहर व एमआयडीसी भागात दिले जाते. आता हे धरण भरल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.
साधारण धरणात साडेआठ टीएमसी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात आता १३६८ मिली मिटर या मोसमात पाणीसाठा झाला आहे. पाण्यावर पवन मावळ्याची शेती देखील अवलंबून आहे. असे हे अतिशय महत्त्वाचे धरण भरल्याने मावळ व पिंपरी चिंचवडकरांनी आनंद व्यक्त केला आहे.