महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१५ सप्टेंबर ।। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये आपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही मोठी घोषणा केली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, ‘मी २ दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.’, असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
कथित दारू घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर शुक्रवारी अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर आले. शनिवारी केजरीवालांनी आपल्या पत्नीसह हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली आणि बजरंगबलीचे दर्शन घेतलं. त्यानंतर अरविंद केजरीवाल आज आप कार्यालयात पोहोचले. याठिकाणी त्यांनी आप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी केजरीवाल यांनी दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले की, ‘देवाचा आपल्या सर्वांवर मोठा आशीर्वाद आहे. म्हणूनच आपण मोठ्या समस्यांशी लढतो आणि विजयी होऊन बाहेर पडतो. यासह मी लाखो लोकांचे आभार मानतो ज्यांनी आमच्या साथीदारांसाठी प्रार्थना केली.’
अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका करताना सांगितले की, ‘या लोकांना तुरुंगात पाठवून आम आदमी पार्टी फोडायची होती. तुरुंगात राहिल्याने माझे मनोबल वाढले आहे. तुरुंगातून एलजी यांना पत्र लिहिले. जेव्हा मी एलजी यांना पत्र लिहिले तेव्हा मला धमकी देण्यात आली. कौटुंबिक बैठक बंद करण्याच्या धमक्या देण्यात आल्या.’ अरविंद केजरीवाल यांनी पुढे असेही सांगितले की, ‘मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी आणि मनीष सिसोदिया जनतेमध्ये जाऊ. दिल्ली विधानसभा विसर्जित होणार नाही. माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील.’, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अरविंद केजरीवाल यांनी पुढे सांगितले की, ‘भाजपने आणखी एक नवा फॉर्म्युला तयार केला आहे की जिथे जिथे ते निवडणूक हरतील तिथल्या मुख्यमंत्र्यांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायचे आणि त्यांचे सरकार पाडायचे. त्यांनी सिद्धरामय्या, पिनाराई विजयन, ममता दीदी यांच्यावर गुन्हा दाखल केला. ते एका विरोधी मुख्यमंत्र्यालाही सोडत नाहीत. सर्वांवर खोटे गुन्हे दाखल करतात, तुरुंगात टाकतात आणि सरकार पाडतात.’
तसंच, ‘मी देशातील सर्व बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की आता पंतप्रधानांनी तुम्हाला खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकले तर राजीनामा देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नका. जेलमधून सरकार चालवा. असे नाही की आपल्याला पदाचा लोभ आहे. कारण आपली राज्यघटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि लोकशाही वाचवणे महत्त्वाचे आहे.’, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे.