महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. २३ जुलै – : म्हाडाच्या घरासाठी पेटीएमवर किंवा पोस्टाच्या खात्यावर पैसे पाठवा असे सांगून फसवणुकीच्या घटना होत असल्याने त्यासंदर्भात म्हाडा ने सावधगिरीचा इशारा दिला आहे. म्हाडातर्फे अशा प्रकारे पैशांचे व्यवहार होत नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
घरे मिळवून देण्यासाठी अशा प्रकारे पैसे गोळा करायला म्हाडाने कोणाही प्रतिनिधीची नियुक्ती केली नाही, असेही म्हाडा ने कळविले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा आशयाचे काही संदेश समाजमाध्यमांवर फिरत असल्याचे म्हाडा प्रशासनाला दिसून आले होते. दादर परिसरात म्हाडाची घरे विक्रीस उपलब्ध असून ती विकत घेण्यासाठी पेटीएम मार्फत किंवा “कॉर्पोरेट सेंट्रल कॉलेक्टिव हब म्हाडा” या नावाने इंडियन पोस्ट बँकेच्या खात्यावर पैसे मागवले जात होते.
म्हाडातर्फे बांधलेल्या सदनिका जाहीर संगणकीय सोडतीद्वारे वितरित केल्या जातात. अशा सदनिकांची जाहिरात वर्तमान पत्रांतून प्रसिद्ध होते. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सदनिका विक्रीचे अर्ज नागरिकांकडून मागविले जातात आणि अर्जाची रक्कम व अनामत रक्कम म्हाडाने जाहिरातीत नमूद केलेल्या बँकेतच जमा केली जाते. या सर्व प्रक्रियेनंतर सदनिकांची जाहीर संगणकीय सोडत काढण्यात येते, असे म्हाडाने दाखवून दिले आहे
त्यामुळे नागरिकांनी अशा कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये व म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रक्रियेतच सहभाग घ्यावा. भविष्यातही हीच कार्यप्रणाली कार्यरत राहणार आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवहारांमध्ये कोणी सहभागी झाल्यास म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे म्हाडाच्या वतीने कळविण्यात येत आहे. कोणाचीही अशाप्रकारे फसवणूक होत असल्याची माहिती म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा विभागास पुढील पत्त्यावर कळवावी. मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी, गृहनिर्माण भवन, चौथा मजला, कला नगर, वांद्रे पूर्व, मुंबई 51. दूरध्वनी – 022-66405445, 022-66405446..