१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर ।। महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचं वेध लागलं आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात निवडणूक होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.

गणेशोत्सव संपल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्यापासून सलग ३ दिवस महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपावर बैठक होणार आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या व्यस्त आहे तरीही जागावाटपाचा लवकर तोडगा काढला पाहिजे. काँग्रेस नेत्यांना आम्ही बैठकीचं आमंत्रण दिलंय. ते इतके व्यस्त आहेत त्यामुळे तारखावर तारखा देत आहेत. त्यामुळे आज आम्ही ठरवलंय, काहीही झालं आजपासून ३ दिवस आम्ही चर्चा करू असं त्यांनी म्हटलं.

महायुतीही एक्टिव्ह मोडवर
पुढील २ दिवसानंतर जागावाटपावर युतीच्या बैठका सुरू होतायेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पहिली बैठक होईल. या बैठकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी किती जागा लढवणार याचा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर येत्या ८ दिवसांत काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बैठकांना वेग आला आहे. युतीबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि घोषणाही करतील अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, नेत्यांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी ७ वाजता ही बैठक होईल. महायुतीतील घटक पक्षांसोबत असलेले वादाचे मुद्दे, निवडणुकीची रणनीती यावर अजित पवार नेत्यांना सूचना देणार आहेत. तसेच महामंडळ वाटपावरही चर्चा होईल.

तिसऱ्या आघाडीचीही बैठक
राज्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यासोबत आता तिसऱ्या आघाडीचीही बैठक होणार आहे. आमची तिसरी आघाडी नसून महाशक्ती असेल, ही जनतेची शक्ती असेल. याबाबत उद्या आमची बैठक आहे. राजू शेट्टी, संभाजीराजे, राजरत्न आंबेडकर आणि काही मुस्लीम संघटनांशी आमची चर्चा आहे. या बैठकीत वैचारिक मुद्दे स्पष्ट होतील त्यातून आम्ही निवडणुकीला सामोरे जावू अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *