महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ सप्टेंबर ।। वडगाव मावळ ।। आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरास आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवसापासूनच या शिबिराला नागरिकांनी कडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिबिराचे हे सातवे वर्ष असून 28 सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कान्हे उपजिल्हा रुग्णालय येथे शिबिर सुरू राहणार आहे. कोणताही गाजावाजा अथवा औपचारिक उद्घाटन समारंभ न करता या शिबिरात रुग्णसेवेला प्रारंभ करण्यात आला. मावळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा यासाठी विविध स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे.
शिबिरात एमआरआय तपासणी, सीटी स्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी, चष्मे, औषधे, श्रवण यंत्र या सुविधांबरोबरच मोफत रुग्णवाहिका सेवा देखील देण्यात आली आहे. शिबिराच्या अंतर्गत हृदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया. मोतीबिंदू, हाडांचे फ्रॅक्चर, कान – नाक –घसा शस्त्रक्रिया, श्वसनालिकेच्या शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, मणक्याच्या, किडनीच्या, गर्भपिशवीच्या, मुतखड्याच्या, सांध्याच्या, अपेंडिक्सच्या, मूळव्याधीच्या शस्त्रक्रिया, मॅमोग्राफी, हर्निया, पित्ताशय किंवा पित्ताशयातील खड्यांची शस्त्रक्रिया, कॅन्सर संदर्भात शस्त्रक्रिया, गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा तिरळेपणा व अन्य समस्यांबद्दल शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. तसेच श्रवणयंत्र, चष्मे, रक्त तपासणी आणि नेत्र तपासणी देखील मोफत करण्यात येत आहेत.
निरोगी मावळचा संकल्प करणारे हे महाआरोग्य शिबिर गुरुवार दिनांक 19 ते 28 सप्टेंबर या काळात उपजिल्हा रुग्णालय कान्हे येथे आयोजित केले आहे. एकाच दिवशी गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक गावनिहाय दिवस ठरविण्यात आले आहेत.
जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आाहन
पहिल्या दिवशी देहू शहर, सुदुंबरे, सुदवडी, जांभवडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, नाणोली तर्फे चाकण, आंबी, वारंगवाडी, नवलाख उंबरे, बधलवाडी, जाधववाडी, परीटेवाडी, मिंडेवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, शेटेवाडी, कदमवाडी आणि आंबळे या गावांतील काही हजार नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. अत्यंत नेटक्या व सुनियोजित पद्धतीने संयोजन केल्यामुळे नागरिकांना या शिबिरात चांगल्या सेवा-सुविधा प्राप्त झाल्या. मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन, माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ, श्री विठ्ठल परिवार मावळ आणि कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.