महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ सप्टेंबर ।। कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेससाठी चेअर कारकरिता ११६० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी २००५ रुपये तिकीट दर आहे. मात्र प्रवासात तुम्हाला जेवण नको असेल तर मात्र याच प्रवासासाठी ७९६ रुपये आणि १६०५ रुपये इतके तिकीट आकारले जाणार आहे. यामुळे जेवण नको असलेल्या प्रवाशांना ३६४ रुपयांची सवलत तिकिटात मिळणार आहे.
कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत
सुरू झाली आहे. या गाडीला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. शुक्रवारी पुणे-कोल्हापूर या मार्गावर या गाडीची दुसरी तर आतापर्यंत एकूण तीन फेऱ्या झाल्या. प्रत्येक फेरीला प्रतिसाद वाढत असून शनिवारी पुण्याला जाणाऱ्या गाडीसाठी शुक्रवारी रात्रीपर्यंत ४१० प्रवाशांचे बुकिंग झाले होते तर रविवारी पुण्याहून कोल्हापूरपर्यंत येणाऱ्या या गाडीत ३४० हून अधिक प्रवाशांचे बुकिंग झाले आहे.
या गाडीला दोन श्रेणी आहेत. त्यापैकी एसी चेअर कारसाठी ११६० रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी २००५ रुपये हा तिकीट दर आहे. मात्र, हे दर प्रवासादरम्यान मिळणाऱ्या जेवणासह आहेत. प्रवासात प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार व्हेज किंवा नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. मात्र तिकीट बुकिंग करतानाच व्हेज की नॉनव्हेज हे नमूद करावे लागणार आहे. हे जेवण नको असेल आणि जेवणाशिवाय तिकीट हवे असेल तर एसी चेअर कारसाठी ७९६ रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १६०५ रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे.