Sharad Pawar: ‘१० दिवसात ‘मविआ’चे जागावाटप, शरद पवारांनी सांगितली महत्वाची रणनिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ सप्टेंबर ।। राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन दावे- प्रतिदावे सुरु आहेत, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मविआच्या जागावाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे. येत्या १० दिवसात मविआचे जागा वाटप पुर्ण करण्याचा प्रयत्न करु, असे शरद पवार यांनी म्हटले आहे, तसेच लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत, असा दावाही त्यांनी केला. बारामतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत एकाने निर्णय घेण्यापेक्षा विविध सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याजिल्ह्यात इच्छुकांचा अभ्यास सुरु आहे. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते त्यांच्या मुलाखती घेतील, त्यानंतर तीन पक्ष मिळून निर्णय होईल. त्यामध्ये आमची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. तीन पक्षांनी मिळून निवडणुकीला सामोरे जात आहोत, त्यामुळे एखाद्या जागेवर कोणी निवडणूक लढवावी, याबाबतही एकवाक्यता असावी, अशी रणनिती आहे. गेल्या तीन दिवसांपासून यासंबंधी तिन्ही पक्षांची मुंबईमध्ये बैठक सुरु आहे, आणि जागांचे वाटप करत आहेत, येत्या १० दिवसात हे संपवून प्रत्यक्षात लोकांच्यात जाण्याचा विचार आहे, असं शरद पवार म्हणाले.

राज्यात सात वर्षांपूर्वी काँग्रेसचा खासदार निवडून आला, राष्ट्रवादीचे चार निवडून आले, यावेळी तीस लोक निवडून आले. तसेच महाराष्ट्रात आशादायक चित्र, मविआसाठी अनुकूल वातावरण आहे. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाला बाजूला करण्याच्या मनस्थितीत लोक आहेत. लोक परिवर्तन करण्यासाठी इच्छुक आहेत, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *