महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने सोमवारी (२३ सप्टेंबर) पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.

या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. यावर आता अक्षय शिंदेंच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेचे वडील म्हणाले की, पोलिसांनी सांगितलेलं सगळं खोटं आहे. माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं आहे. मी त्याला नुकतचं जाऊन भेटून आलो आहेत. त्याला साधं होळीची पिचकारी बंद नाही करता येत तर तो पोलिसांनी बंदूक कुठून चालवेल. तो कधी फटाकेही वाजवत नव्हता. याबाबत पोलिसांनीही आम्हाला काही सांगितलं नाही. मी टीव्हीवर पाहिलं तेव्हा मला ही घटना समजली आहे, असं अक्षय शिंदेच्या वडिलांनी सांगितलं आहे.