IMD Rain Prediction : परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार ; वाचा वेदर रिपोर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ सप्टेंबर ।। प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोमवारी राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे, ठाण्यासह कोकणाला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आजही राज्यात पावसाची अशी स्थिती कायम राहणार असून हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, देशाच्या उत्तरेकडून नैऋत्य मोसमी पावसाची माघार होत आहे. राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून पावसाने एक्झिट घेतली आहे. महाराष्ट्रातही परतीचा पाऊस सुरु झाला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येत्या ७२ तासांत जोरदार पावसाची हजेरी राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मंगळवारी २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत ढगांच्या गडडाटासह तुफान पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागानं संपूर्ण राज्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात
मुंबईसह उपनगरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. मंगळवारी पहाटेपासूनच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये धुव्वाधार पाऊस सुरु आहे. ठाणे शहराला परतीचा पावसाचा फटका बसला असून रात्रभर पावसाची बॅटिंग सुरू होती. ठाण्यात मागील ८ तासांत तब्बल ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे शहरातील आंबेडकर रोड, वंदना सिनेमा, घोडबंदर रोड या ठिकाणी पाणी साचले होते.

मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले
नाशिक जिल्ह्यासह परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. मनमाडसह चांदवड तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातून वाहणाऱ्या रंगूळणा व पांझन नदीला मोठा पूर आला असून शहरातील दोन भागांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहे. त्यातच संपूर्ण शहर गेल्या काही तासांपासून अंधारात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

मराठवाडा-विदर्भात तुफान पाऊस
परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भाला देखील चांगलाच तडाखा दिला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव, बीड तसेच हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम आणि नागपूर शहरात पावसाच्या सरी बरसल्या. अहमदनगर, धुळे, नंदुबार आणि जळगाव जिल्ह्यातही परतीच्या पावसाने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *