महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ सप्टेंबर ।। पुणे शहर, जिल्हा तसेच पिंपरी चिंचवड भागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे. वादळी वार्यासह घाटमाथ्यावर पाऊस पडेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, सोमवारी सायकांळी विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली.
शहरात मागील आठवड्यापासून कडक ऊन पडत होते, त्यामुळे उकाड्यातही चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान, रविवारी संध्याकाळी शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चांगलीच दाणादाण उडाली. सोमवारी दिवसभर देखील कडक ऊन होते. मात्र, संध्याकाळी ढग दाटून आल्याने पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात थंडावा मिळाला. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस घाटमाथ्यासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.