राज्यात टेस्टिंग वाढवल्याने करोना रुग्णसंख्येत वाढ ; मुंबईतील करोना संसर्गाची स्थिती अधिक वाईट: शरद पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नाशिक – ता. २५ जुलै – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. नाशिकमधील वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील करोना उपाययोजनांचा आढावा शरद पवार यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला.

राज्यात टेस्टिंग वाढवल्याने करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.


भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यांत रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, सोलापूर, अकोला याठिकाणी करोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही मुंबई येथील स्थिती अधिक वाईट आहे. अनेक तज्ज्ञांनी आपल्याला येत्या काळात करोनासोबत जगावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्या जिल्ह्यांतील सर्व प्रमुखांची बैठक घेऊन, समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही महिने कोरोनाशी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्यावा हा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आज नाशिक जिल्हा आढावा बैठक घेण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले. राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत असे करून चालणार नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये ही सरकारची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील गरजू करोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर या महागड्या औषधांची उपलब्धता करून ५० औषधे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. याआधी देखील २५ औषधे देण्यात आली होती तसेच गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी नेहमीच पुढाकार घेण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

आरोग्याप्रमाणे आर्थिक संकटदेखील मोठे आहे. राज्यात नामांकित औद्योगिक केंद्रे आहेत. ही केंद्रे सुरू करून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊन बाबत निर्णय घ्यावा असे आवाहनही त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *