SEBI Life Cycle Funds : गुंतवणूक सोपी करणार सेबीचा नवा फंड! वयानुसार आपोआप बदलेल पोर्टफोलिओ

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मार्च २०२६ ।। भविष्यातील गरजा लक्षात घेऊन गुंतवणूक करताना योग्य फंड निवडणे आणि वेळोवेळी पोर्टफोलिओमध्ये बदल करणे अनेक गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरते. मात्र आता ही चिंता कमी होणार आहे. कारण Securities and Exchange Board of India (सेबी) ने ‘लाईफ सायकल फंड्स’ ही नवी म्युच्युअल फंड श्रेणी सुरू केली आहे. हे फंड दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून गुंतवणूकदाराच्या वयानुसार आणि उद्दिष्टाच्या कालावधीनुसार पोर्टफोलिओ आपोआप बदलत राहतो. उदाहरणार्थ, ‘लाईफ सायकल फंड २०४५’ किंवा ‘२०५५’ अशा नावांनी हे फंड उपलब्ध असतील. ज्या वर्षी तुम्हाला पैसे आवश्यक असतील त्या वर्षाचा फंड निवडून गुंतवणूक करता येईल.

या फंडांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘ग्लाइड पाथ’ पद्धत. सुरुवातीच्या काळात गुंतवणूक जास्त प्रमाणात इक्विटीमध्ये म्हणजेच शेअर बाजारात केली जाते, जेणेकरून दीर्घकालीन मोठा परतावा मिळू शकतो. मात्र उद्दिष्टाची तारीख जवळ येत गेली की फंड व्यवस्थापन हळूहळू शेअर्समधील गुंतवणूक कमी करून ती सुरक्षित पर्यायांकडे वळवते. यात बॉन्ड्स, डेट फंड, तसेच Gold ETF आणि Silver ETF यांसारख्या पर्यायांचा समावेश असतो. त्यामुळे गुंतवणूकदाराला स्वतः पोर्टफोलिओचे संतुलन करण्याची गरज राहत नाही आणि जोखीमही हळूहळू कमी होत जाते.

या फंडांमुळे गुंतवणूकदारांना अनेक फायदे मिळू शकतात. ऑटोमॅटिक पोर्टफोलिओ बॅलन्सिंग, दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन, जोखीम व्यवस्थापन आणि एकाच फंडातून विविध गुंतवणूक पर्यायांचा लाभ असे अनेक फायदे यात मिळतात. मात्र गुंतवणूक लवकर काढू नये यासाठी ‘ग्रेडेड एक्झिट लोड’ लागू करण्यात आला आहे. एका वर्षाच्या आत पैसे काढल्यास ३ टक्के, दोन वर्षांत २ टक्के आणि तीन वर्षांत १ टक्के दंड आकारला जाईल. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या तरुण गुंतवणूकदारांसाठी आणि मुलांच्या शिक्षण किंवा निवृत्ती नियोजनासाठी हे फंड उपयुक्त ठरू शकतात. 💰📈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *