मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ सप्टेंबर ।। हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे जिल्हा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला असून पिंपरी चिंचवड शहरात पाऊस सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

पाऊस सुरु असल्याने शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय समन्वय ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे क, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालय, विजयकुमार खोराटे यांच्याकडे ड, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय तर चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही करण्याचे तसेच पाणी तुंबण्याच्या घटना घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा पाठविण्याचे निर्देश देखील आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. आपत्कालीन प्रसंगी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून परिस्थिती हाताळावी,अशा सूचना देखील आयुक्त सिंह यांनी दिल्या आशेत.

दरम्यान, पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून आयुक्त सिंह सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी अधिकाऱ्यांचे पथक शहरातील आपत्कालीन परिस्थितीची माहिती घेत असून आवश्यक सूचना नियंत्रण कक्षामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. दक्षतेच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळण्याकामी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या ०२०-६७३३११११ किंवा ०२०-२८३३११११ या क्रमांकावर अथवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या मुख्य नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *