महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ सप्टेंबर ।। घरात एखादं चिमुकलं मूल आलं की, घरातील जवळपास सर्वच गोष्टी बदलतात. लहान मुलांच्या गोष्टींना जागा देखील जास्त लागते. ज्या घरात तान्ह बाळ असतं, त्यांच्याकडे कपडे, औषधाच्या भरपूर बाटल्या पाहायला मिळतील. घरी लहान मूल असेल तर औषधं ठेवलीच पाहिजेत, असा पालकांचा समज असतो. अनेक घरांमध्ये पालक एकदा औषधांची बाटली वापरली म्हणजेच ती उघडली तर ती बाळाला दिल्यानंतर सुरक्षित ठेवतात. तर ज्यावेळी मूल पुन्हा आजारी पडतं तेव्हा तेच औषध मुलाला देतात.
पण आता प्रश्न असा आहे की, औषधाची बाटली उघडल्यानंतर ती किती वेळ वापरायची असते? औषधाची बाटली एकदा उघडून ठेवल्यानंतर पुन्हा त्याच बाटलीतून मुलाला औषधं दिल्याने काही नुकसान होऊ शकतं का? तज्ज्ञांनी याबाबत आपल्याला माहिती दिलीये.
एकदा औषधाची बाटली उघडल्यानंतर किती काळ वापरायची?
मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयातील एचओडी आणि वरिष्ठ सल्लागार-बालरोग डॉ समीर सदावर्ते यांनी माहिती दिली की, औषधांची बाटली दीर्घकाळ उघडी ठेवल्यास त्याला रचना, रंग, एक विचित्र वास येऊ शकतो. काही प्रकारची औषधं डिस्टिल्ड वॉटर टाकून तयार केली जातात. जर ही औषधं जास्त काळ उघडी ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया शिरण्याची किंवा आंबण्याची शक्यता जास्त असते.
औषधाच्या प्रकारानुसार, औषधाच्या बाटलीचे शेल्फ लाइफ पाच दिवसांपासून ते एका महिन्यापर्यंत असू शकतं. परंतु औषध सात दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नये. जर एखाद्याला उघडलेली औषधाची बाटली साठवायची गरज असेल, तर ती थंड, कोरड्या जागी आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवून केली पाहिजे, असंही डॉ. सदावर्ते यांनी सांगितलं आहे.
एकदा उघडलेल्या बाटलीतून बाळाला पुन्हा औषधं का देऊ नये?
औषधाची बाटली उघडली की तिची परिणामकारकता कमी होऊ लागते.
एकदा उघडलेल्या बाटलीतून बाळाला औषधं दिलं तर त्याचा परिणाम कमी होऊ शकतो.
बाळाला उघडलेल्या बाटलीतून औषध देताना एक्सपायरी डेट तपासा. ही एक्सपायरी डेट सीलबंद पॅक औषधाची असते.
बाटली उघडल्यानंतर औषध खराब होण्याचा धोका असतो, अशावेळी डॉक्टरांच्या सल्लाशिवाय ही औषधं देऊ नये.
बाटली उघडल्यानंतर औषध हवेतील बॅक्टेरियाच्या संपर्कात येतं. त्यामुळे हे औषध बाळाला दिल्याने त्याला एलर्जी होऊ शकते.