तिरूपती लाडू प्रसादाच्या वादावर जगनमोहन रेड्डी यांचा मोठा खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ सप्टेंबर ।। चंद्राबाबू नायडू सरकारच्या काळात 2014 ते 2019 पर्यंत सुमारे 14 ते 15 वेळा गुणवत्तेच्या निकषांमुळे तिरूमला बालाजी मंदिरातील लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणारे तूप नाकारण्यात आले होते. त्याचप्रमाणे 2019 ते 2024 पर्यंत 18 वेळा तूप नाकारण्यात आले होते, यामध्ये सर्व तथ्य आहे, असा खुलासा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केला आहे.


दर 6 महिन्यांनी लाडूसाठी निविदा मागवल्या जातात
ते पुढे म्हणाले की, दर 6 महिन्यांनी लाडूसाठी निविदा मागवल्या जातात. कमी किमतीची निविदा येते, त्याला टीटीडी बोर्डाकडून मान्यता दिली जातो. यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही. त्यानंतर पुरवठादारांना टँकर प्रमाणित करून प्रमाणपत्र सादर करावे लागते. परंतु, याबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू खोटे बोलत आहेत. तूप खरेदीची ई-निविदा ही अनेक दशकांपासून दर 6 महिन्यांत होणारी नित्याची प्रक्रिया आहे. हे वर्षानुवर्षे चालत आलेली असून त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही.

चंद्राबाबू नायडू मंदिराच्या पावित्र्याबद्दल अफवा पसरवत आहेत.
चंद्राबाबू नायडू आमच्या पक्षावर आणि हिंदूंच्या भावनांवर आणि तिरुमला प्रसाद आणि मंदिराच्या पावित्र्याबद्दल अफवा पसरवत आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी नियुक्त केलेल्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी 23 जुलै रोजी तपासणी केल्यानंतर वनस्पति तेलाचा समावेश असल्याचे आढळले. त्यानंतर पुरवठादारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

राज्यभरातील वायएसआर नेत्यांना नोटिसा
तिरूपती बालाजीच्या लाडूच्या प्रसादाच्या वादावरून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत जगन मोहन रेड्डी यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, राज्यात राक्षसी राजवट सुरू आहे. मी तिरुमला मंदिराला भेट देणार आहे. परंतु, सरकार अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी राज्यभरातील वायएसआर नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये म्हटले आहे की तिरुमला मंदिराला भेट देण्याची परवानगी नाही. तसेच आमच्या पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही परवानगी नाही. त्यामुळे नेत्यांना त्या कार्यक्रमाला येऊ दिले जात नाही.

जगनमोहन रेड्डी यांना रेनिगुंटा विमानतळावर नोटीस
दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांना आज (दि.२७) रेनिगुंटा विमानतळावर उतरल्यानंतर प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करू नये म्हणून त्यांना नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. वायएसआरच्या कार्यकर्त्यांना तिरुपतीमध्ये काही ठिकाणी एकत्र येण्यास सांगितले जात होते. आणि त्यामुळे पोलिसांनी अनेक नेत्यांना नोटीस बजावली आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक सभा आणि कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यासाठी कलम ३० लागू करण्यात आले आहे. आम्ही सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहिल्या आहेत. ज्यात लोकांना तिरुपतीमध्ये काही ठिकाणी एकत्र येण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्या लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना न येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *