महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ सप्टेंबर ।। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने विरोधकांना अक्षरशः धुळ चारली. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने १० पैकी १० जागा जिंकत मुंबईमध्ये ठाकरेंचाच आवाज असल्याचे सिद्ध केले. या दणदणीत विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. तसेच सिनेट निवडणुकीत गुलाल उधळल्यानंतर आता विधानसभेलाही विरोधकांना आस्मान दाखवू असा विश्वास व्यक्त केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
‘मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष, शिंदे गट प्रयत्न करत होता. मात्र हायकोर्टाने त्यांना दणका दिला. दहापैकी दहा जागा जिंकून मुंबईतला युवा, सुशिक्षित वर्ग हा शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे सिद्ध झालं आहे. शिंदे गट, भाजप मत विकत घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र ही मते विकत घेता येत नाहीत. तसेच या निवडणुका बॅलेट पेपरवर होतात, त्यामुळेही आम्ही जिंकलो,” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
‘धर्मवीर’वरुन तोफ डागली!
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी धर्मवीर २ चित्रपटावरुनही एकनाथ शिंदेंवर तोफ डागली. ‘धर्मवीर २ चित्रपट हा बोगस, बकवास काल्पनिक, सिनेमा आहे. दिघे साहेबांचे निधन २००१ मध्ये झाले. राज ठाकरेंनी २००५ मध्ये पक्ष सोडला. २००१ मध्ये मृत्यू झालेले दिघे साहेब राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याबाबत कसे बोलत आहेत? या चित्रपटातून दिघे साहेबांचे चारित्र्य हनन होत आहे. दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह खांद्यावर टाकून आत्ताचे मुख्यमंत्री उतरत आहेत, असं चित्रपटात दाखवलं आहे. ते पाहून मला धक्काच बसला. कोण असले चित्रपट लिहित आहे. हा दिघे साहेबांचा अपमान आहे,’ असंही राऊत म्हणाले.
धारावी प्रकल्पावरुन बोलताना अदांनींना सरकार सांगेल ते ऐकावं लागेल नाहीतर कॉन्ट्रॅक्ट परत घेऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावरुनही संजय राऊत यांनी निशाणा साधला. ‘देवेंद्र फडणवीस यांना अदानींचे कॉन्ट्रॅक्ट परत घेण्याचा अधिकार आहे का? अदानी हे मोदी- शहांचे लाडके उद्योगपती आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. तसेच धारावीचे आंदोलन शिवसेनेने जिवंत ठेवले आहे, शिवसेना या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे,’ असंही राऊत म्हणाले.