Manoj Jarange In Mumbai : मुंबईत जाण्यापूर्वीच मनोज जरांगेंच्या आंदोलकांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. 26 जानेवारी ।। Manoj Jarange In Mumbai: आपले आंदोलन शेवटच्या टप्प्यात आले आहे पण, शेवटच्या मराठा माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, जातीसाठी लढा सुरू ठेवू असा इशारा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सभेला नियोजित वेळेपेक्षा सुमारे पंधरा तास उशीर झाला तरीही वातावरणात उत्साह होता. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवली सराटी येथून मोर्चा घेऊन निघालेले जरांगे पाटील यांच्यासमवेत मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. त्यांची सभा लोणावळ्याजवळील वाकसाई येथे गुरुवारी (ता. २५) दुपारी झाली. त्यांच्या सभेची नियोजित वेळ बुधवारी (ता. २४) रात्री साडेआठची होती.

पण, प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी ते गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास पोचले.‌ सलग प्रवास, गाठीभेटी व ठिकठिकाणच्या सभा यामुळे दुपारी सव्वाबारा वाजता सभेला प्रारंभ झाला. मात्र, बुधवारी रात्री साडेआठपूर्वीच सभास्थळी पोचलेले मराठा बांधव रात्रभर जागून होते. आंदोलकांची वाहने रात्रभर सभास्थळी येतच होती. अखेर गुरुवारी दुपारी सभेबाबतची प्रतीक्षा संपली.

गर्दीतून वाट काढत सभास्थळी पोचलेले जरांगे पाटील म्हणाले, ‘‘पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे इथपर्यंत यायला उशीर झाला. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. सततच्या प्रवासामुळे थकवा आला होता. थोडा वेळ झोपलो. तिथे दोन शिष्टमंडळ आले होते.

एक जुनं व एक नवं. नव्या शिष्टमंडळाशी आपलं काही पटलं नाही. म्हणून ते परत गेले. आता दुसरं जुनं शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यांना थांबवलंय, जेवणही तयार होतं. पण, त्यांना सांगितलंय, आधी माझ्या समाजाशी बोलतो, मग आपण बोलू. तुमच्याशी बोलल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. कारण आपल्याला मुंबईला जायचे आहे. त्याआधी वाशीला सभा होईल. तेथून पायी मोर्चा आझाद मैदानावर जाईल. तिथे आपण उपोषण करणार आहोत. कारण, आरक्षण मिळणं हा आपल्या लेकरांचा प्रश्‍न आहे. मी दिलेला शब्द पाळतो. आम्ही काट्यात उभे राहू, जाळात उभे राहू, पण जातीसाठी लढा सुरू ठेवू.’’

आंदोलनादरम्यान काहींनी त्रास दिला. पण, वेगळे वळण लावू द्यायचं नव्हतं, म्हणून सर्व सहन केलं. आरक्षण मिळू द्या, मग त्रास देणाऱ्यांचा हिशोब पूर्ण करू, असा इशाराही त्यांनी दिला.‌

जरांगे पाटील यांच्या आंदोलकांना सूचना

मुंबईत जाताना महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, तिथली माणसं आपली हे लक्षात ठेवा

मुंबईतील लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या

आपल्या रॅलीत, आंदोलनात कोणी जातवार उद्रेक करतोय का? यावर लक्ष ठेवा, अशांना पकडून पोलिसांकडे द्या.

मोर्चात सहभागी माता-भगिनींचे संरक्षण करा.

मुंबईत वाहने जिथे लावाल तिथेच आराम करा, यामुळे वाहनांचेही संरक्षण होईल

कोणी त्रास देत असेल तर, त्याला काहीही न करता माझ्याकडे घेऊन या, मग, त्याला मी दाखवतो.

कोणी चुकीचे वक्तव्य केल्यास मला विचारल्याशिवाय कोणाला काही बोलू नका

आपला वापर कोणी राजकीय हेतूने करतोय का? त्याबाबत दक्ष राहा

रस्त्याने जाताना वाहतूक कोंडी आपणच मोकळे करा, एकामार्गाने चाला

आपल्यासमोर अनेक संकटं आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी एकजूट असू द्या, दिलेला शब्द पाळा.

एकमेकांशी सावध भूमिकेत राहा, कोण काय सांगेल, यावर विश्‍वास ठेवू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *