महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ सप्टेंबर ।। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 1 ते 30 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.
अर्ज भरण्यासाठीची मुदत काय?
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे अर्ज भरणाऱ्यांसाठी 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. बारावी परीक्षेसाठी ऑक्टोबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज महाग झाले
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यामार्फत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यासाठीचं शुल्क यंदाच्या वर्षापासून वाढवण्यात आलं आहे. कागद महाग झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना अर्ज करताना अधिक पैसे भरावे लागणार आहेत. नेमकी ही वाढ किती आहे आणि आधी किती पैसे भरावे लागायचे आता किती पैसे भरावे लागणार जाणून घेऊयात सविस्तरपणे…
जुनी आणि नवी किंमत किती?
> कागद महागल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात 12 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
> कागद महाग झाल्याने 12 टक्के दरवाढीमुळे आता विद्यार्थ्यांना अर्जासाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
> 50 रुपयांची वाढ झाल्याने दहावीचे परीक्षा शुल्क 420 रुपयांवरुन 470 रुपयांवर गेलं आहे.
> तर 12 वीच्या परीक्षा शुल्कांमध्ये 50 रुपयांची वाढ झाल्याने 440 ऐवजी आता विद्यार्थ्यांना 490 रुपये भरावे लागणार आहेत.
> परीक्षा शुल्कासह प्रशासकीय, गुणपत्रिका, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक
अर्ज भरण्यासाठी सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक असणार आहे. सरल प्रणालीद्वारेच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सरल प्रणालीबाबत माहिती घेऊन विद्याथ्यर्थ्यांना निर्धारित वेळेत अर्ज करणे अनिवार्य आहे. अनेक शाळांमध्ये यासंदर्भातील मार्गदर्शन केलं जातं. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून हा अर्ज भरुन घेतला जातो.
दहावी आणि बारावीची परीक्षा ही शालेय आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षांचे टेन्शन विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही अधिक असते. त्यामुळेच अर्ज भरण्यापासून ते अगदी निकाल लागून पुढील वर्गात प्रवेश घेईपर्यंत पालकांचाही जीव टांगणीला लागल्याचं पाहायला मिळतं.