महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ सप्टेंबर ।। भारत आणि बांगलादेश संघात होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात पावसामुळे मोठा अडथळा आला आहे. शुक्रवारपासून कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात पहिल्या दिवसापासून पावसाचा अडथळा आला आहे.
आता पहिल्या दोन दिवशी जोरदार पाऊस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मैदान ओले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी मैदान खेळण्यासाठी योग्यप्रकारे न सुकल्याने या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात आत्तापर्यंत केवळ ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे पावसामुळे दुसऱ्या दिवशीही एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. त्याआधी पहिल्या दिवशी पावसामुळे नाणेफेकीलाही उशीर झाला होता. उशीराने झालेली नाणेफेक भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशकडून झाकिर हसन आणि शादमन इस्लाम हे सलामीला उतरले. त्यांनी संयमी सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पण झाकिर २४ चेंडू खेळल्यानंतरही एकही धाव न करताच बाद झाला. त्यानंतर शादमनही ३६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. दोघांनाही आकाश दीपने बाद केले.
यानंतर मोमिनुल हक आणि कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. मात्र २९ व्या षटकात शांतोला आर अश्विनने बाद केले. शांतोने ५७ चेंडूत ३१ धावा केल्या.
पण त्यानंतर काही वेळातच कमी सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आणि नंतर जोरदार पावसालाही सुरुवात झाली. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळही ३५ षटकांनंतर थांबण्यात आला. त्यावेळी मोमिनुल ४० धावांवर, तर मुश्फिकूर रहिम ६ धावांवर नाबाद होता. तसेच बांगलादेशने ३५ षटकात ३ बाद १०७ धावा केल्या होत्या.