WTC Points Table: जयसूर्या तळपला ; श्रीलंकेने शड्डू ठोकला, न्यूझीलंडचा पराभव करत WTCच्या फायनलमध्ये दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ सप्टेंबर ।। श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत इतिहास रचला आहे. श्रीलंकेने तब्बल 15 वर्षांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. श्रीलंकेने न्यूझीलंडचा एक डाव आणि 154 धावांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 63 धावांनी विजय मिळवला होता.

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात (Sri Lanka vs New Zealand) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजय मिळवत श्रीलंकेने 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली आहे. या मालिका विजयासह जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धाच्या (WTC) गुणतालिकेत देखील मोठे उलटफेर झाले आहेत. श्रीलंकेने WTC च्या गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

WTC च्या गुणतालिकेत सध्या टीम इंडिया 71.67% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा पराभव करत श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. श्रीलंकेचे 55.56% गुण झाले आहेत. तर इंग्लंडचा संघ 42.19% गुणांसह चौथ्या, 39.29% गुणांसह बांग्लादेश पाचव्या, 38.89 % गुणांसह दक्षिण अफ्रिका सहाव्या, 37.50 % गुणांसह न्यूझीलंड सातव्या स्थानावर आहे. तर 19.5 % गुणांसह पाकिस्तानचा संघ आठव्या क्रमांकावर आणि 18.52 वेस्ट इंडिजचा संघ नवव्या स्थानावर आहे.

श्रीलंकेने सनथ जयसूर्यावर सोपवली मोठी जबाबदारी-
श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माजी दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या यांनी धुरा घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने इतिहास रचण्यास सुरुवात केली आहे. श्रीलंकेने पहिले भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकला आणि आता कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 अशा फरकाने विजय मिळवला.

 

भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात पावसाची बँटिंग
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त एक दिवसाचा खेळ झाला आहे. पावसामुळे कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. तर आज तिसरा दिवसाचा खेळही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सामन्यात पहिल्या दिवशीही पावसाने हजेरी लावली होती. कसोटीमधील दुसरा आणि तिसरा दिवस एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *