महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। आगामी विधानसभेची निवडणूक भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुती एकत्रित लढणार असून, जागावाटपाबाबत चर्चा सुरू असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी महत्वाचं विधान केलं आहे. २०२९ मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचे आहे, असं शाह म्हणाले.
मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपण सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले, असंही त्यांनी सांगितलं. आपली निराशा झटकून टाका. कोणत्या सर्व्हेचा विचार करू नका. मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार येईल. त्यासाठी जोमात आणि होशमध्ये काम करा, असा कानमंत्रही शाह यांनी कार्यकर्त्यांना दिला. यंदा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.