महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। आगामी विधानसभा निवडणुकीमुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे नेत्यांनी जागावाटपासाठी बैठकांवर बैठका घेणे सुरु आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं भाष्य केलं आहे.
‘दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप होईल जाहीर’
आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी जागावाटपाविषयी मोठं भाष्य केलं. जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘महाविकास आघाडीचं घटस्थापनेला जागावाटप बहुतांश पूर्ण होईल. दसऱ्याच्या मुहूर्तावर बहुतांशी जागांचा जागावाटप महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जाहीर करतील. काही जागा आहेत. प्रत्येक विभागात या जागांवर दोन पक्ष किंवा तीन पक्ष दावा करतात. तर ते काही ठिकाणी भांडूद्यात. थोडा फार तर तिढा राहणारच. त्यामुळे त्याचं टेन्शन कोणी घेऊ नये, यावर सुद्धा निर्णय होईल’.
‘प्रत्येक विभागातल्या दोन-चार जागांवर चर्चा सुरू आहे. आमची निफाडच्या जागेवरून शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. अशा इतरही जागा आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले.
आव्हाडांची अमित शहांवर टीका
अमित शहा यांच्या वक्तव्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘भाजप पक्ष मगरीसारखा सगळ्यांना गिळण्याचं काम करतो. 2029 ला फक्त भाजपचं सरकार येणार म्हणजे इतरांना तो गिळणार आहेच. इतर राज्यातही त्यांनी आपल्या मित्र पक्षाला बाजूला करून सत्ता स्थापन केली आणि महाराष्ट्रात सुद्धा तेच होणार आहे’.
महाविकास आघाडीच्या जागवाटपाच्या बैठकीला कोण कोण नेते उपस्थित होते?
शिवसेना (ठाकरे गट)
संजय राऊत
अनिल देसाई
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
जयंत पाटील
अनिल देशमुख
जितेंद्र आव्हाड
काँग्रेस
नाना पटोले
बाळासाहेब थोरात
विजय वडेट्टीवार