महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। बदलापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. बदलापूर प्रकरणी शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. कोर्टाने अटकपूर्व अर्ज फेटाळल्याने शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना मोठा झटका बसला आहे.
कोर्टाने उपस्थित केले अनेक सवाल
बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामिनाचा अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले. फरार आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहत आहेत का? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.
कोर्टाने पोलिसांना फटकारलं
पोलिसांनी या आधीही नीट काम केलं नाही. आताही करत नाहीयेत, अशी खरमरीत टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबरला होणार आहे. बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. अक्षय शिंदेच्या वकिलांना हस्तक्षेप करण्यास देखील उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे.
शाळेतील सीसीटीव्हीत फुटेजमध्ये छेडछाड?
न्यायमूर्ती लड्डा यांच्या खंडपीठाने शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचं उच्च न्यायालयाचं मत आहे. शाळेच्या ट्रस्टींना घटनेची कल्पना असूनही त्यांनी ती लपवल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. गुन्ह्याची माहिती मिळाल्यांतरही स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने मांडलं.
राज्य सरकारने कोर्टात दिली कबुली
गुन्हा दाखल होण्याच्या आधीच ते फरार झाले आहेत. तसेच शाळेतील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत. आम्ही त्यांना शोधण्यात अजूनतरी अपयशी ठरलो आहोत, अशी कबुली राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली.