महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। “लाडकी बहीण’ योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे आम्ही दहा ऑक्टोबरपर्यंत देणार आहोत. हे पैसे स्वतःसाठी वापरा. महिलांनी सन्मानाने राहावे यासाठीच ही योजना आणली आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजी महाराज चौकातून निघालेल्या फेरीत अजित पवार यांचे जेसीबीद्वारे पुष्पहार घालून स्वागत झाले. खासदार सुनील तटकरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, “बीड जिल्ह्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करते. सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी जन सन्मान यात्रेचे आयोजन केले. दहाव्या अर्थसंकल्पात महिलांना समोर ठेवून योजना ठरविल्या.
मुख्यमंत्री लाडकी बिहीण योजनेवर ४६ हजार कोटी रुपये खर्च करीत आहोत.” “केंद्र सरकार आपल्या विचारांचे असल्याने आम्ही सांगितल्याबरोबर कांदा निर्यातीवरील बंदी उठवली. आमच्या योजनेमुळे विरोधकांच्या पोटात मळमळ होत आहे. महायुती सरकारला निवडून आणा. सरकार आल्यास या सर्व योजना पुढील पाच वर्षे सुरू राहतील,” असेही पवार म्हणाले.
‘मुंडे यांना मोठी जबाबदारी देणार’
तटकरे म्हणाले, “धनंजय मुंडे तुम्ही परळीपुरते नेते नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहात. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर विरोधी पक्षनेता कसा असावा ? हे धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला दाखविले. २०२४ नंतर मोठी जबाबदारी धनंजय मुंडे यांना देण्यात येणार आहे.”