पुणेकरांवर करावा लागू शकतो पाणीटंचाइचा सामना ; ‘ही’ धरणे फक्त ४० टक्के भरली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. २७ जुलै – पावसाने जुलै महिन्यात दोन आठवडे ओढ दिल्यामुळे धरणातील पाण्याचे नियोजन कोलडमडले आहे. कमी पावसामुळे जुलैचा शेवटचा आठवडा आला तरी सरासरीपर्यंत पाऊस पोहोचलेला नाही. मात्र, जूनमध्ये झालेल्या पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी पावसाने ओलांडली आहे. निसर्ग वादळापाठापोठ आलेला मान्सून पूर्व पाऊस आणि महिनाभर कमी-अधिक पडलेल्या पावसामुळे जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर सलग दोन आठवडे पावसाने ओढ दिली.

पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी चार प्रमुख धरणे ही गेल्या वर्षी २६ आणि २७ जुलै रोजी शंभर टक्के भरून मुठा नदी ही दुथडी भरून वाहत होती. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने ही धरणे यंदा जेमतेम ४० टक्के भरली असून, चार धरणांमध्ये ९.८४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे २६ आणि २७ जुलै रोजी वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर ही चारही धरणे शंभर टक्के भरली होती. त्यामुळे मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, यंदा परिस्थिती चिंताजनक असून, चार धरणांमध्ये सुमारे ९.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये वरसगाव धरणामध्ये ४.०४ टीएमसी, पानशेत धरणात ४.२७ टीएमसी, खडकवासला धरणामध्ये ०.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरणात ०.७२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. टक्केवारीनुसार वरसगाव धरण हे सुमारे ३१.५० टक्के, पानशेत धरण सुमारे ४० टक्के, खडकवासला धरण सुमारे ४१ टक्के आणि टेमघर धरण हे सुमारे २० टक्के भरले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये २.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. हे प्रमाण सुमारे ३५ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *