महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. २७ जुलै -राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मंगळवारपर्यंत (ता.२८) कोकण वगळता बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सुरू होण्याची अंदाज आहे. आज (ता.२७) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेले काही दिवस मराठवाडा, खानदेश, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर दोन दिवस मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. कोकणातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. रविवारी राज्यात अंशत: ढगाळ हवामान होते, तर पावसानेही उघडीप दिली. पुण्यातील राजगुरूनगर येथे ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पूर्व भाग हिमालयाकडे सरकला असून, बिकानेरपासून मेघालयापर्यंत विस्तारला आहे. पाकिस्तान आणि परिसरावर असलेल्या पश्चिमी चक्रवातापासून कोकण किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर समुद्र सपाटीपासून २.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे.
रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस़ मिलिमीटरमध्ये ( स्त्रोत – हवामान विभाग ) :
कोकण : भिरा ७९, राजापूर २५, दोडामार्ग ४४, कणकवली २८, मालवण २९, सावंतवाडी २९,
मध्य महाराष्ट्र : अकोले ३७, धुळे ३६, गिधाडे २७, शिरपूर ४६, शिंदखेडा २५, गगनबावडा २७, पेठ ३२, सुरगाणा २७, राजगुरूनगर ७५, पुणे शहर ३७, सासवड २५,
मराठवाडा : नायगाव खैरगाव २०, देगलूर ६२.
विदर्भ : जळगाव जामोद २१, वरोरा २०.