महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। जम्मू – काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांची घोषणा होताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत १० ऑक्टोबरला दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती एका वृत्तवाहिनीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
जम्मू काश्मीरच्या निकालानंतर घोषणा
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आठ तारखेला जाहीर होणार आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त सुरक्षा दृष्टिकोनातून सोईस्कर होईल असं पण म्हटलं जात आहे.
विधानसभेचा धुरळा उडाला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय ‘उड्या’ही सुरु झाल्या आहेत.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यांसोबत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांचा मुहूर्त लागेल असं बोललं जात होतं, पण केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत फक्त उत्तरेतील या दोन राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा दौरा
मागील महिन्यात दोन दिवस केंद्रीय निवडणूक आयोग (२८ आणि २९ सप्टेंबर) महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर होते.. १४ सदस्य असलेल्या या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकामार्फत राज्यातील राजकीय पक्षांची परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि इतर बाबींसंदर्भात आढावा घेण्यात आला. साधारणतः संबंधित राज्यांच्या आढावा बैठकीनंतर आठ ते दहा दिवसात निवडणुकीची घोषणा केली जाते. तसे संकेत पण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत मिळत होते. मात्र निवडणुका कधी होतील याचे उत्तर मुख्य निवडणूक आयुक्तांनी देणं टाळलं होतं.
मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमधील मेगा निर्णयांचा धडाका पाहता या गोष्टींना बळ मिळत आहे. या अनुषंगाने आगामी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याबरोबरच झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची पण घोषणा होऊ शकते.