महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर ।। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले असताना केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात दर्जा मिळणार आहे. अभिजात मराठीच्या घटस्थापनेनंतर आज राज्यभर जल्लोष करण्यात आला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची औपचारिक घोषणा केली. मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे.
मराठीभाषेच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रात तसेच अन्य राज्यांमध्येही केंद्रांची उभारणी करण्यात येईल. सांस्कृतिक मंत्रालयाकडून याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत शिक्षण मंत्रालयातर्फे या केंद्रांची उभारणी होईल. उत्तर भारतातही ही केंद्रे असतील असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. भाषेचे प्राचीनत्व सिद्ध करणारे १५०० ते २००० वर्षांपासूनचे साहित्य, काव्य, ग्रंथसंपदा, शिलालेख आणि अन्य पारंपरिक पुराव्यांच्या आधारे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे.
मराठीसोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात दर्जा मिळणार आहे. आतापर्यंत देशात तमीळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यात आता मराठीसह पाच भाषांची भर पडणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जापासून मराठीला वंचित ठेवले जात असल्याचा मुद्दा राजकीय पक्षांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यिक, विचारवंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हा विषय मांडला जात होता.