रेल्वे कर्मचाऱ्यांची दसऱ्या आधीच दिवाळी ! बोनस म्हणून प्रत्येकाला मिळणार..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर ।। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाने तब्बल 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित बोनस म्हणजेच पीएलबी जाहीर केला आहे. कामावर आधारित 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे. यासाठी 2000 कोटींहून अधिकचा निधी देण्यात आला आहे.

कोणाकोणाला मिळणार या बोनसचा लाभ?
समोर आलेल्या माहितीनुसार, 2023-2024 या वर्षात भारतीय रेल्वेची कामगिरी खूप चांगली राहिली. रेल्वेने 1588 दशलक्ष टन इतकी विक्रमी मालवाहतूक केली, तर जवळजवळ 6.7 अब्ज प्रवासी वाहतूक केली. याच कामगिरीची दखल घेत मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये देशभरातील 11 लाख 72 हजार 240 रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाच्या मोबदल्यात 78 दिवसांचा पगार या सर्व कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 2028 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पॉइंट्समन, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, ट्रॅक मेंटेनर, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी, लोको पायलटबरोबरच एक्स सी कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे.

दसऱ्याआधीच बोनस
पीएलबीसाठी पात्र असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली जाणारी ही रक्कम दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी वितरीत केली जाते. यावर्षीही सुमारे 11 लाख 72 हजारांहून अधिक अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगारा इतकी रक्कम पीएलबी म्हणून दिली जाणार आहे.

बोनस म्हणून किती रक्कम मिळणार
वेगवेगळ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या 78 दिवसांच्या पगाराचा विचार केल्यास बोनस म्हणून दिली जाणारी कमाल रक्कम 17 हजार 951 रुपये इतकी आहे. ही रक्कम विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाईल. एवढी रक्कम मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी आणि इतर गट ‘क’ कर्मचारी यांना वितरीत केली जाईल.

विक्रमी कामगिरीत अनेक घटकांचा समावेश
रेल्वेच्या या विक्रमी कामगिरीमध्ये अनेक घटकांचा हातभार लागला. सरकारने रेल्वेमध्ये विक्रमी भांडवली खर्च केल्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा, कामकाजातील कार्यक्षमता आणि उत्तम तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींचा यात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *