महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर ।। बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा दिले आहेत. मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. गुरुवारी रात्री उशिरा बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजितदादांनी यासंबंधी संकेत दिले. अजित पवार यांनी आपला मानस व्यक्त करताच, भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. मात्र अजित पवारांनी ‘वेट अँड वॉच’ सांगत संदिग्धतेचा धुरळा उडवून दिला.
याआधीही अजित पवार यांनी सुपुत्र जय पवार बारामतीतून विधानसभा लढणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर या चर्चा मागे पडल्या आणि अजितदादाच उमेदवार असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र गुरुवारी पुन्हा एकदा खुद्द अजित पवारांनीच यासंबंधी संकेत दिले. त्यामुळे आता अजित दादा कुठून उभे राहणार, हा प्रश्न समर्थकांच्या मनात आ वासून उभा राहिला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“मागच्या वेळी जेवढे आमच्या परिवारातील लोक तुम्हाला भेटायला येत होते, तेवढं यावेळी जास्त कोणी येणार नाही. उलट, यंदाच्या वेळेस मी जो उमेदवार देणार आहे, त्या उमेदवाराच्याच कामाकरिता… (कार्यकर्ते आक्रमक झाले) त्याच पद्धतीने त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण करणार आहेत, ते त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल.” असं अजित पवार म्हणाले.
एकटा पडलेलो नाही
“मी जसं मागे म्हटलो होतो, की मी जसा एकटा पडलोय, तसा मी एकटा पडलेलो नाही. मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आज ते पूर्ण करत नाही. ज्यावेळेस उमेदवार अर्ज भरायचा असेल त्यावेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगेन. त्यावेळेस तुम्हालाही समजून येईल, असे एकंदरीत चित्र आहे.” असंही अजित पवार पुढे म्हणाले.
लोकसभेवेळी तुम्ही आमच्यावरती रागावला होता कांदा निर्यातबंदी केली म्हणून.. आता कांदा निर्यात बंदी उठवली आहे. लोकसभेवेळी अल्पसंख्याकांची मतं आम्हाला मिळाली नाहीत असं का केलं? मी कधी जातीच राजकारण केलं नाही, असंही अजित दादा यांनी विचारलं.