Ashwini Vaishnaw: रेल्वेचंही होऊ शकतं खासगीकरण? मंत्री अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑक्टोबर ।। देशाचे संरक्षण दल आणि रेल्वे या दोन्ही व्यवस्था देशाचा कणा आहेत. त्यामुळे रेल्वेचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच नाही. केंद्र सरकारच्या पातळीवरही तसा प्रयत्न नसल्याचा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला. केंद्र सरकारकडून रेल्वेचे खासगीकरण केले जात असल्याचे सांगून देशातील जनतेत भ्रम निर्माण केला जात असून, राजकारण करू नका अशा शब्दांत वैष्णव यांनी विरोधकांना सुनावले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या साठ वर्षांत रेल्वेला मिळायला हवे तितके महत्त्व मिळाले नसल्याचे सांगत वैष्णव यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील रेल्वेकडे दुर्लक्ष झाल्याची टीका केली.

रेल्वे सुरक्षा बलाचा ४० वा स्थापना दिन नाशिकरोड येथील क्षेत्रीय रेल्वे पोलिस प्रशिक्षण केंद्रात वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री वैष्णव यांनी देशातील रेल्वेच्या सध्याच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सकाळी सव्वादहा वाजता त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या विविध आठ विभागांतील तुकड्यांच्या परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर रेल्वे बँड पथकाच्या सुरेल देशभक्तीपर धुनवर रेल्वे पोलिस आणि श्वान पथकाने परेड कमांडर यतीन भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक संचलन करून वैष्णव यांना मानवंदना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक मनोज यादव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, माजी महापौर उपस्थित होते.

२०२३ आणि २०२४ या दोन वर्षांत देशभर प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी अतुल्य धाडस दाखविलेल्या रेल्वे पोलीस बलातील ३३ अधिकारी आणि जवानांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदके आणि जीवनरक्षा पदके प्रदान करून वैष्णव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नाशिकचा कुंभनगरीसह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची वीरभूमी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख वैष्णव यांनी भाषणात केला. त्यांच्या हस्ते ‘संगयान’ या मोबाइल अॅपचे प्रकाशन करण्यात आले. नव्याने लागू करण्यात आलेल्या तीन फौजदारी कायद्यांविषयीच्या संदर्भ पुस्तकांच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशनही त्यांनी केले. रेल्वे सुरक्षा बलांच्या क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रात महिला सुरक्षा आणि सुविधांकडे लक्ष दिले जावे, असे आवाहन त्यांनी केले. ४० हजार किमी विद्युतीकरण यावेळी वैष्णव यांनी रेल्वेच्या कामांबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, केंद्रात मोदी सरकार येण्यापूर्वी रेल्वे दुर्लक्षित राहिली. मोदी सत्तेत येताच रेल्वेत तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ, सुरक्षा आणि विस्तार यावर भर देण्यात आला. आता रेल्वेचे बजेट अडीच लाख कोटींवर गेले. गेल्या ६० वर्षांत देशात केवळ २० हजार किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होते. गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी देशात ४० हजार किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करून दुप्पट विद्युतीकरण केले. वंदे भारत, अमृत भारत यांसारख्या आधुनिक रेल्वेगाड्यांतून जलद, सुरक्षित आणि परवडणारा प्रवास देण्यासाठी केंद्र सरकारचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, असे ते म्हणाले.

रेल्वे मंत्र्यांच्या घोषणा
रेल्वे पोलिसांच्या नाशिकरोड येथील क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी ३५ कोटींचा निधी
रेल्वे पोलिसांच्या तामिळनाडूतील श्वान पथक क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रासाठी साडेपाच कोटी अमृत भारत ट्रेन गरिबांसाठी असून, वंदे भारतच्या सर्व सुविधा या गाड्यांतून देणार ‘कवच’ सुरक्षा प्रणाली देशातील सर्व रेल्वेगाड्यांत कार्यान्वित करणार
जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बुलेटप्रूफ जकेट, हेल्मेट देणारइन्स्पेक्टर कॅडरला ग्रुप बीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *