महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑक्टोबर ।। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ‘थार रॉक्स’ या ‘एसयूव्ही’ने अवघ्या एका तासात तब्बल १.७६ लाखांची नोंदणी मिळवत नवा विक्रम नोंदवला आहे. दसऱ्यापासून ‘थार रॉक्स’ ग्राहकांना सुपूर्त कऱण्यात येणार आहे. त्यासाठी आज नोंदणी सुरू करण्यात आली. नोंदणीच्या पहिल्या दिवशी एका तासात या ‘एसयूव्ही’ने विक्रमी नोंदणी मिळवली आहे. महिंद्राच्या गाडीसाठी एका दिवसात मिळालेली ही सर्वोच्च नोंदणी आहे.
ग्राहकांचा थार रॉक्सला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असून, पुढील तीन आठवड्यांत टप्प्याटप्प्याने ग्राहकांना वितरणाची माहिती देण्यात येईल. सर्व वितरकांकडे आणि महिंद्राच्या वेबसाइटवर ‘थार रॉक्स’साठी नोंदणी सुरू राहणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ‘थार रॉक्स’च्या बेस मॉडेलची किंमत १२.९९ लाख रुपये असून, ती पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही आवृत्तींमध्ये उपलब्ध आहे, तर ‘थार रॉक्स’च्या ‘फोर बाय फोर’ प्रकाराची किंमत १८.७९ लाख ते २२.४९ लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे.
सप्टेंबरमध्ये कंपनीने ५१ हजारहून अधिक एसयूव्हींची विक्री झाली असून, त्यात २४ टक्क्यांनी वार्षिक वाढ नोंदवली आहे. त्यात थारचा वाटा मोठा आहे. कंपनीच्या वाहन व्यवसाय विभागाचे सीईओ राजेश जेजुरीकर म्हणाले, ‘‘थार रॉक्स हे विशिष्ट उत्पादन म्हणून डिझाइन केलेले नाही, तर या ‘एसयूव्ही’ श्रेणीमधील ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन मुख्य प्रवाहातील एसयूव्ही म्हणून डिझाइन केले गेले आहे.’’