Ganpat Gaikwad : गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। भाजप आणि शिंदे गटामध्ये झालेल्या राड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांना ताब्यात घेतलं आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा उल्हासनगरमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यावेळी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या. त्यातल्या दोन गोळ्या महेश यांना लागल्याचं सांगितलं जातंय.

घटनेत जखमी झालेले सेनेचे महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह तिघांना पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतलं आहे.

शुक्रवारी रात्री काय घडलं?

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयात भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी जमले होते. भाजप आमदार गणपत गायकवाड त्यांचे कार्यकर्ते तसेच कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते.

आपापसातील वाद मिटवण्यासाठी हे पदाधिकारी जमले होते. या दरम्यान झालेल्या वादावादीतून ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे कल्याण परिसरात तणावाचे वतावरण असून कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *