महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑक्टोबर ।। देशातून मान्सून माघारी फिरण्यास २३ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत मान्सूनच्या परतीचा प्रवास रखडला होता. शनिवार ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या माघारीच्या प्रवासाची सुरुवात झाली. ५ ऑक्टोबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली.
राज्यात पावसाळा संपल्यानंतर फारसा पाऊस झालेला नाही. पाच दिवसांमध्ये सरासरी ६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पाच दिवसांमध्ये सर्वसाधारणपणे २२.६ मिलीमीटर पाऊस पडतो. हा पाच दिवसांमधील पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के कमी आहे. कोकण आणि गोवा मिळून ८३ टक्के, मध्य महाराष्ट्रात ६४ टक्के, मराठवाड्यात ५० टक्के आणि विदर्भात ८९ टक्के पाऊस या कालावधीत कमी पडला आहे. नवरात्रीमध्ये मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता होती. मात्र १ ऑक्टोबरपासून ५ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत मुंबई शहरात ८८ टक्के, तर मुंबई उपनगरामध्ये १०० टक्के पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी पडला आहे. या पाच दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्यात ९८ टक्के, पालघर जिल्ह्यात ९९ टक्के, रायगड जिल्ह्यात ८७ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ७५ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७५ टक्के पाऊस कमी नोंदला गेला आहे.
मुंबईमध्ये बुधवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम लांबेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. सर्वसाधारणपणे ५ ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मान्सून माघारी फिरतो. यंदा नंदुरबारमधून मान्सूनने माघार घेतली असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता आहे. मुंबईतून मान्सून माघारीची सर्वसाधारण तारीख ८ ऑक्टोबर मानली जाते.
उकाड्याची जाणीव तीव्र
सध्या मुंबईत पाऊस नसला, तरीही वातावरणात आर्द्रता असल्याने उकाड्याचे प्रमाण अधिक जाणवत आहे. मुंबईत शनिवारी कुलाबा येथे ३३, तर सांताक्रूझ येथे ३२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. वातावरणात दिवसभरात ६० टक्क्यांच्या आसपास आर्द्रता होती. पावसाळी वातावरण निवळत असल्याने ऑक्टोबरमधील उकाड्याची जाणीव तीव्र होत असल्याची भावना मुंबईकर व्यक्त करत आहेत.