रेल्वेप्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ ९ एक्स्प्रेस धावणार दादरपर्यंतच, असे आहे नियोजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑक्टोबर ।। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची संख्या वाढण्यासाठी फलाट क्रमांक १२ आणि १३चा विस्तार करण्याचे काम मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून करण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाच्या कामांमुळे लांब पल्ल्यांच्या नऊ रेल्वेगाड्या दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत.

३१ डिसेंबरपर्यंत मेल-एक्स्प्रेस दादर ते सीएसएमटीदरम्यान रद्द राहणार असून यात तेजस, जनशताब्दी एक्स्प्रेस यांचाही समावेश आहे. गाडी क्रमांक २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी या गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी गाडी ठाणे स्थानकात रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर रिकामी गाडी स्वच्छतेसाठी यार्डात जाणार आहे. गाडी क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी, गाडी क्रमांक ११४०२ अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम, गाडी क्रमांक १२११२ अमरावती-सीएसएमटी, गाडी क्रमांक २२१०८ लातूर-सीएसएमटी आणि गाडी क्रमांक २२१४४ बिदर-सीएसएमटी, गाडी क्रमांक १९०२० भुनवनेश्वर-सीएसएमटी यांचा प्रवास दादर स्थानकातच संपुष्टात येणार आहे.

दादर ते सीएसएमटी असा लोकलने प्रवास करत मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सीएसएमटी स्थानक गाठावे लागणार आहे. रेल्वे मंडळाने प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी २४ डब्यांच्या अधिकाधिक रेल्वेगाड्या चालवण्याच्या सूचना रेल्वे विभागांना केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये फलाट क्रमांक १० आणि ११ वर रेल्वेगाड्या सुरू करण्यापूर्वी ३६ तासांचा विशेष ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या फलाट क्रमांक १० आणि ११ वरून चालवण्यात येत आहेत.

गाड्या वाढवण्याचे नियोजन करताना पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने फलाट क्रमांक १२-१३ ची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या चालवण्यासाठी सीएसएमटीमध्ये चार फलाट उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *