![]()
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यामधील गुंतवणूक वाढल्याने सोने दरातील तेजी कायम आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सोने दरात सतत वाढ होत असून, सोमवारी सायंकाळी जीएसटीसह सोने प्रतितोळा 54 हजार 170 रुपयांवर गेले आहे. सोन्याच्या दरातील हा उच्चांक मानला जात असून, सोने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने प्रतिऔंस दर 1,800 डॉलर्सच्या पुढे गेला आहे.
दहा दिवसांपूर्वी सोने प्रतितोळा 49 हजार ते 50 हजार रुपयांच्या आसपास होते. यामध्ये तेजी-मंदी कायम होती. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सराफ व्यवसाय मंदीत चालत होता. आता काही अटींवर शासनाने सराफ दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे; पण तोच सोन्याचे दर गगनाला भिडत आहेत.
सोन्याच्या किमतीत चालूवर्षात 28 टक्के वाढ झाली आहे. सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठा ग्राहक देश आहे. त्यामुळे देशात सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. मात्र, सोने आयातीने वित्तीय तूट वाढत असल्याने सरकारने सोन्यावर आयात शुल्क वाढवले आहे. सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आकारले जाते. याशिवाय सोन्यावर 3 टक्के जीएसटी ग्राहकाला द्यावा लागतो. त्यामुळे सोन्याची प्रत्यक्ष किंमत ही बाजारभावापेक्षा जास्त असते. दरम्यान, सोन्याच्या उच्चांकी किमतीचा मागणीवर परिणाम झाला आहे. सोमवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,920 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 50,920 रुपये झाला आहे. चांदीचा भाव किलोला 61,220 रुपये झाला आहे. सर्व करांसह सोन्याचा भाव 54 हजार रुपये तोळा झाला आहे.
