महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑक्टोबर ।। पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडत भाजपा आणि शिवसेनेसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, लोकसभेमध्ये शरद पवारांच्या प्रभावामुळे अजित पवारांना चांगलाच धक्का सहन करावा लागला. त्यातच त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात बारामतीत त्यांच्या पत्नींचा पराभव झाला. शरद पवारांना लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळाले. मात्र, आता विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी बारामती अजित पवारांनी वक्तव्य केले होते की, ”मी निवडून दिलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे”, त्यामुळे बारामतीतून पुन्हा एकदा निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत.
आता अजित पवार नेमकी निवडणूक कुठल्या मतदारसंघातून लढवणार याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात असल्याचे माहिती समोर येत आहे. त्यामुळे आमदार अशोक बापू पवार यांच्याविरोधात अजित पवार अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.