महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑक्टोबर ।। लोकसभेत महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाने विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. स्वतः पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरुन महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. सहा दशकांचा राजकीय अनुभव असलेल्या शरद पवारांनी एकापाठोपाठ एक डाव टाकत महायुतीला खिळखिळी करण्याचा चंगच बांधला आहे. म्हणूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दररोज अनेक दिग्गजांचे प्रवेश होत आहेत.
विधानसभेला तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अजित पवार गटासह भाजपच्याही गोटात खळबळ उडाली आहे. सध्या पुण्यामध्ये सध्या शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळावी, यासाठी महाराष्ट्रातून तब्बल १६०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभेच्या रणसंग्रामात ‘तुतारी’चाच आवाज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका सध्या पुण्यात सुरु आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सलग तीन दिवस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. शनिवारी (ता. ५ ऑक्टोबर) दिवसभर मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या तर आज (रविवार, ६ ऑक्टोबर) दिवसभर घेणार विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. सोमवारी सकाळी इंदापुर येथील हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या सभेनंतर दुपारी पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील.
उमेदवारीसाठी १६०० अर्ज..
आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात विदर्भातील १२ जिल्ह्यातल्या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती शरद पवार यांनी घेतल्या. या आधी त्यांच्या निवासस्थानी मोदीबागेत देखील अनेक इच्छुकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांच्या पक्षातून लढण्यासाठी महाराष्ट्रातून 1600 अर्ज प्राप्त झालेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून तब्बल 68 अर्ज करण्यात आले आहेत. मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शरद पवारांसमोर भावी आमदारांच्या मुलाखती..
दरम्यान, पुण्यामध्ये आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनीही शरद पवार यांच्यासमोर मुलाखत दिली. विदर्भातील कुठल्याही मतदारसंघातून पक्षाने जबाबदारी दिली तर निवडणूक लढवणार, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पक्ष देईल त्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार असल्याचं देशमुख यांनी सांगितले. तसेच बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनीही आज शरद पवार यांची भेट घेतली.
काल बीडसाठी आमदार संदिप क्षीरसागर यांच्या व्यतिरिक्त 8 जणांनी मुलाखती दिल्यात त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार क्षीरसागर पवारांच्या भेटीला आलेत. शरद पवार यांनी आमदार संदिप क्षीरसागर यांना लंच टाईमात भेट दिली. या भेटीदरम्यान, उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, मतदारसंघातील काही कामांबाबत पवारांशी बोलायचे होते म्हणून आलो होतो. बीडमधून माझ्या नावाला कोणाचाही विरोध नाही, आमदारकी देखील मीच पुन्हा लढणार आहे, असं ते म्हणाले.