Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑक्टोबर ।। व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा घेऊन येत असते. आता व्हॉट्सॲपद्वारे itr दाखल करणे देखील शक्य झाले आहे. तसेच कंपनी लवकरच निअर बाय शेअरची सुविधादेखील सुरू करणार आहे. यामध्ये तुम्ही इंटरनेट नसतानाही हवी ती फाइल,फोटो,व्हिडिओ भले ते mb साइजला कितीही मोठे असले तरी शेअर करू शकणार आहात. आता पुढच पाऊल टाकत आपल्या सर्वांना आवडणारे व्हॉट्सॲप आणखी एका मोठ्या बदलाच्या वाटेवर आहे. ज्या व्हॉट्सॲपला आपण फोन नंबरवर चालणारे अॅप म्हणून ओळखतो, त्यात आता युजरनेम वापरण्याची सुविधा येत आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप आता एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे युजर स्वतःचे युजरनेम बनवू शकतील. इतकेच नाही तर या युजरनेमनच्या आधारे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसलेल्या लोकांशीही चॅट करू शकणार आहात. विशेष म्हणजे ही सुविधा सध्यातरी फक्त व्हॉट्सॲप वेबसाठी उपलब्ध होणार आहे.

हे फीचर अजूनही डेव्हलपमेंटच्या स्टेजवर असले तरी, व्हॉट्सॲप त्याच्या डिझाईनमध्ये बदल करत आहे. अलीकडेच त्यांनी व्हॉट्सॲप वेबच्या इंटरफेसमध्येही बदल केले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, व्हॉट्सॲप हे फीचर लाँच करण्याआधी त्याची सर्व परीक्षणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

काम कसे करणार?
इतर सोशल मीडिया ॲप्स जसे की instagram किंवा टेलीग्रामप्रमाणेच व्हॉट्सॲपवरही तुम्ही तुमचे स्वतःचे युजरनेम बनवू शकणार आहात. हे युजरनेम वेगळे असतील आणि आधीपासून कोणीही वापरत नसेल तर ते तुम्ही निवडू शकणार आहात. महत्वाची गोष्ट म्हणजे, डिस्कॉर्डसारख्या ॲप्समध्ये असलेल्याप्रमाणे येथे युजरनेमसोबत कोणतीही टॅग किंवा डिस्क्रिमिनेटर (उदा. Sayali.123) नसेल. म्हणजेच तुमचे युजरनेम पूर्णपणे वेगळे आणि तुमच्याच नावावर असेल.

हे फीचर सुरुवातीच्या सेट-अप दरम्यान उपलब्ध होईल. तुमच्या युजरनेमनची उपलब्धता तपासून तुम्ही ते निवडू शकाल. यामुळे तुमच्या फोन नंबरशिवाय एखाद्या वेगळ्या ओळखीने तुम्ही इतरांना जोडू शकाल. तुमचा फोन नंबर असलेले कॉन्टॅक्ट तुम्हाला पूर्वीप्रमाणेच शोधू शकतील.

पण या नवीन फीचरमुळे तुमच्याशी फक्त तुमचा फोन नंबर किंवा युजरनेम माहिती असलेलेच लोकच संपर्क करू शकतील. यामुळे तुमच्या खासगी माहितीचे रक्षण होईल आणि तुम्ही कोणाला संपर्क करू द्यायचा आणि कोणाला नाही यावर तुमचा अधिक नियंत्रण राहील.

हे फीचर अजूनही डेव्हलपमेंटच्या स्टेजवर असल्यामुळे त्याच्या लाँचची तारीख अजून निश्चित नाही. व्हॉट्सॲप त्याच्या हाय स्टँडर्ड्स राखून एखादीही चूक नसलेले आणि सुरक्षित असे फीचर यूजर्सना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या फीचरची अधिकृत घोषणा कधी होईल याची अद्याप माहिती नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *