महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑक्टोबर ।। सोशल मीडियावरचे फॉलोअर्स किंवा पोस्ट केलेल्या फोटो, व्हिडीओला मिळणाऱ्या लाइक्सवर एखाद्या व्यक्तीच्या प्रसिद्धीचे मोजमाप केले जाते, त्यामुळे या आधुनिक जमान्यात बहुतांश नागरिक लाईक्सचे भुकेले असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, अशा लोकांना टार्गेट करून हॅकर्स गंडा घालत असल्याच्या घटना वाढत आहेत. ‘तुमचे फॉलोअर्स, लाईक्स वाढवून देतो’, असे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढून लाखो रुपये लुबाडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा आमिषापासून सावध राहून, खातरजमा करूनच पैशांचा व्यवहार करावा, असा सल्ला सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.
मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, बालचमूपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोबाईल आणि सोशल मीडियाने अशरक्षः वेड लावले आहे. अनेकजण दररोजच्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. खाद्यपदार्थांचे फोटो, स्वतः चे फोटो किंवा भ्रमंतीसाठी गेल्यावर काढलेले फोटो, व्हिडीओ शेअर करण्यास अनेकजण पसंती देतात. पूर्वी फेसबुक या एकमेव माध्यमाचा वापर सर्रास केला जायचा. नंतरच्या काळात इन्स्टाग्राम, शेअर चॅट, स्नॅप चॅट, टिकटॉक यांसह अन्य सोशल मीडियावर अॅप्समुळे सोशल मीडियाच्या क्षेत्रात क्रांती घडली.