महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑक्टोबर ।। विधानसभेची निवडणूक वेळेत होवून २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ८) कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) विश्वसनिय सूत्रांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. ७) सोलापूर दौऱ्यावर होते आणि मंगळवारी सोलापुरात वनचपूर्ती सोहळा होणार असतानाही ते बैठकीसाठी पुन्हा मुंबईला परतले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंगळवारी (ता. ८) सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता वचनपूर्ती सोहळा होणार आहे. कॅबिनेटची बैठक दुपारी चारनंतर होणार असल्याचे मंत्रालयातील विश्वसनिय सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दरम्यान, मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या सलग दोन दिवस बैठका पार पडल्या असून आता आज पुन्हा कॅबिनेट बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सोमवारी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून या कॅबिनेटमध्ये १०० हून अधिक विषय ठेवले जाणार आहेत.
दरम्यान, या कॅबिनेटमध्ये आणखी कोणत्या योजनांची घोषणा होणार, कोणत्या घटकांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर झाल्यास बरोबर दिवाळीनंतर मतदान होईल आणि २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार सत्तेत येवू शकेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सागितले. या पार्श्वभूमीवर सध्या मंत्रालयातील हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे.