महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑक्टोबर ।। मुंबईत घर घेण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. आज म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरीची सोडत जाहीर होणार आहे. म्हाडाने 2024 या वर्षात 2,030 घरांसाठी लॉटरी काढली होती. आज 8 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात येणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी १०.३० वाजता सोडतीचा निकाल जाहीर होणार असून या सोडतीत एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार सहभागी होणार आहेत.
म्हाडाच्या 2030 घरांसाठी तब्बल 1,13 हजार 811 अर्ज आले होते. मात्र त्यापैकी 1,13 811 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले होते. मात्र यापैकी २६९ अर्ज अपात्र ठरले होते. नरिमन पॉईंट येथे पार पडणाऱ्या सोडतीसाठी अर्जदारांना प्रथम प्राधान्यनुसार प्रवेश दिला जाणार आहे. तर या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता न येणाऱ्यांसाठी सोडतीच्या थेट प्रेक्षपणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
कुठे आहेत म्हाडाची घरे?
मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवई या ठिकाणी म्हाडाची घरे आहेत. पहाडी गोरेगावमधील मध्यम आणि उच्च गटातील घरांसह पवईतील उच्च गटातील घरांकडे सर्वांचे लक्ष आहे. तसंच, म्हाडाने घराच्या किंमती कमी केल्याने अनेकांचे लक्ष या लॉटरीकडे लागले आहे. कारण कारण बाजारभावाच्या तुलनेत कमी किंमतीत मोठी आणि पंचतारांकित सुविधा असलेली घरे पहिल्यांदा म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत.
कुठे पाहता येणार निकाल?
म्हाडाच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. म्हाडाच्या अधिकृत युट्यूब व फेसबेक पेजवरुन अर्जदारांना सोडतीला निकाल पाहता येणार आहे.
बेवकास्टींगची लिंक- https://housing.mhada.gov.in
विजेत्यांची यादी पाहण्यासाठी वेबसाईट- https://housing.mhada.gov.in
लॉटरी लागल्यानंतर काय?
अर्जदार विजेता ठरल्यानंतर त्याला प्रथम सूचनापत्र पाठवले जाईल. त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठवले जाईल, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.