महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने उत्साहित झालेल्या महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली यादी दसऱ्याला म्हणजेच 12 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. अशी घोषणा राष्ट्रवादीचे (अजित गट) कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे बारामतीमधून लढणार नाहीत, अशीही चर्चा होती. त्यावरही प्रफुल पटेल यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
Maharashtra Politics: हरियाणात चेहरा न दिल्यानं काँग्रेसचा पराभव? CM पदाच्या चेहऱ्यावरून ठाकरे पुन्हा आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो की अजित पवार हे बारामतीतून उमेदवार असतील. मी पहिली जागा जाहीर करतो, असं ते म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्या घोषणेनंतर अजित पवार अन्य कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांच्या वाटपाबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. 235 जागांवर निवडणूक लढवण्याची चर्चा पूर्ण झाली आहे. तर उर्वरित 53 जागांवरही लवकरच निर्णय घेतला जाईल. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जवळपास 60 ते 65 जागा मिळतील. निवडणुकीत आम्ही सन्माननीय जागा मागितल्या होत्या, त्यानुसार आम्हाला 60 ते 65 जागा मिळतील. या जागा वाटपामुळे आम्ही आनंदी आहोत, असंही प्रफुल पटेल म्हणाले.
हरियाणा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांच्या राजकीय पावलावर पुनर्विचार करण्यास भाग पाडतील. हरियाणात भाजपची हॅटट्रिक आणि जम्मू-काश्मीरमध्ये चांगली कामगिरी मोदी सरकारची गेल्या दहा वर्षातील कामगिरी दर्शवते. शेतकऱ्यांचे आंदोलन, विशिष्ट जाती आणि खेळाडूंमधील अशांतता यासह अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी हरियाणा निवडणुकीत भाजप हरणार असल्याचे खोटे कथन माध्यमांद्वारे तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निकालांनी महायुती उत्साहित आहे. लोकसभा निवडणुकीत खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या, असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.